दहावी-बारावी : परीक्षेची भीती वाटतेय?


दहावी-बारावी : परीक्षेची भीती वाटतेय? 

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यातल्या त्यात बारावीची परीक्षा तर उद्यापासूनच सुरु होत आहे आणि परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही काहीसं भीतीचं वातावरण निर्माण होते आणि ते स्वाभाविक आहे. परंतु जर व्यवस्थित अभ्यास केला, तब्येतीची काळजी घेतली आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले तर यश हे निश्चितपणे मिळेलच. 

जर आपल्याला परीक्षेची भीती वाटत असेल तर खालील मुद्दे वाचा आपली भीती दूर होण्यास मदत होईल. 
  • या परीक्षेअगोदर आपण अनेक सराव पेपर सोडवलेले आहेत आणि आपला अभ्यासही झालेला आहे त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. आपण केलेल्या अभ्यासामुळे यश नक्की मिळेल. 
  • परीक्षेच्या आधी त्या त्या विषयाची पुस्तक किंवा नोट्स वर-वर वाचून घ्या जेणेकरून पेपर लिहिताना मुद्दे लवकर आठवतील. 
  • परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावर एक तास लवकर पोहचा जेणेकरून आपला बैठक क्रमांक शोधण्यात गोंधळ होणार नाही आणि नंतरच्या पेपरला अर्धा तास लवकर पोहचा. घरातून निघताना हॉलतिकीट व पेन, पट्टी इत्यादी लेखन साहित्य घेतल्याची खात्री करूनच निघा. 
  • परीक्षेच्या काळात तब्येत चांगली राहील याकडे लक्ष द्या. शक्यतो परीक्षा संपेपर्यंत बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसू नका. पुरेशी झोप घ्या. परीक्षेला जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. 
  • परीक्षेचा ताण (तणाव) जाणवत असेल तर घरातील लोकांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोला ताण कमी होण्यास मदत होईल. 
  • परीक्षेच्या हॉल मध्ये प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर काही जणांना भीती वाटायला लागते, घाम येणे, छातीमध्ये धड-धड वाढणे इत्यादी लक्षण दिसल्यास घाबरून जाऊ नका आणि डोळे बंद करून मन एका ठिकाणी एकाग्र करा व शांतपणे बसा. थोड्या वेळाने पेपर लिहिण्यास सुरुवात करा. 
  • पेपर झाल्यानंतर त्या पेपर विषयी किती बरोबर व किती चूक हे बघू नका याउलट पुढील पेपरची तयारी करा. 
एक गोष्ट लक्षात घ्या जेवढी मेहनत घेतली असेल तेवढे यश नक्कीच मिळेल. या परीक्षेला पूर्ण उत्साहाने व आत्मविश्वासाने सामोरे जा. आपल्याला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या