आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात...
आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड मधील रांची जिल्ह्यात स्थित उलीहातू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना तर आईचे नाव करमी असे होते. बिरसा यांचे आई-वडील हे मुंडा या आदिवासी जमातीचे असल्यामुळे त्यांचे नामकरण सुध्दा मुंडा जमातीच्या परंपरेने करण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे बिरसा यांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसा याची आत्या दासकीर यांच्या आयुभातु येथे गेले. बिरसा यांना बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे इत्यादी गोष्टींत आवड होती. सोबतच ते धनुर्विद्या व नेमबाजीचाही सराव करायचे.
बिरसांना शिक्षणाची खूप आवड होती म्हणून ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या आदिवासी व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात असत. पुढे त्यांनी जर्मन ईशाई मिशन स्कुलमध्ये प्रवेश घेतला (1886) परंतु त्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचे धर्मांतर केले. परंतु जर्मन लुथेरीयन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी शाळेमधील भाषणात आदिवासींबद्दल अपशब्द वापरल्यामुळे बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावत विरोध दर्शविला. त्यामुळे बिरसा यांना शाळेतून काढण्यात आले.
पुढे त्यांनी शिक्षणासाठी म्हणून स्विकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते बंद्गाव येथे काही काळ वास्तव्यास होते (1890-94). याच दरम्यान त्यांचा विवाह हिरीबाई नावाच्या मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. बिरसा यांनी आनंद पांडे या वैष्णवपंथीयाकडून धार्मिक शिक्षण घेतले. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. वाढत्या अभ्यासाबरोबर त्यांचा इग्रजांबद्दल असलेला तिरस्कारही वाढत होता. आदिवासी समाजामध्ये एकता निर्माण करत त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.
1857 च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर मधील आदिवासींच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या. त्या परत मिळवण्यासाठी मुंडा समाजाने प्रमुख ज्यांना “सरदार” म्हटले जाते, त्यांनी संघर्ष सुरु केला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसा यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक आदिवासींनी बिरसाबरोबर आंदोलनात सहभाग घेतला. बिरसांचे आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम लागू केले. 1) गावात आदिवासींच्या जेवढ्या जमिनी आहेत त्यांच्यावर सरकारी वन-अधिकाऱ्यांचा अधिकार राहील. 2) इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालविण्यासाठी परवाने दिले. या दोन्ही गोष्टींमुळे मुंडा आदिवासी समाजाला खूप नुकसान होणार होते. त्यामुळे बिरसांनी या नियमांचा विरोध करत इंग्रजांविरुध्द आवाज उठविला. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
1894 मध्ये आदिवासी भागात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट जमीन महसूल भरणे शक्तीचे केले. त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरामुळे तारण जमिनी सोडविणे अशक्य बनले परिणामी जमीनमालक आदिवासी आता भूमिहीन व वेठबिगार बनला. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुणांना एकत्र केले. “समाजबांधवांनी एकत्र येत धोकेबाज इग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल.” असे बिरसा सांगत असत. “आपण इंग्रजांपेक्षा बलाढ्य आहोत”, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. त्यामुळे इंग्रजांनी बिरसांना बंदी करण्याचे ठरविले व 26 ऑगस्ट 1895 रोजी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले परंतु बिरसांच्या अटकेमुळे आदिवासी समाजात वाढत असलेल्या असंतोषाला बघून त्यांची 30 नोव्हेंबर 1897 रोजी सुटका करण्यात आली.
कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्तपणे बैठका घेत मुंडाराज्य स्थापन करण्यात आले. त्यात 5,000 आदिवासी सहभागी झाले. बिरसांनी 25 डिसेंबर 1899 पासून इंग्रज अधिकारी, ठेकेदारजमीनदार, सावकार इत्यादी इंग्रजांसी निगडीत गटांविरोधात आक्रमक पवित्र घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाला मुंडारी भाषेत “उलगुलान” असे म्हणतात. या आंदोलनात अनेक आदिवासींनी सहभाग घेतला. या मध्ये हजारो पोलीस व आदिवासी मारले गेले. अखेर बिरसा यांना पकडण्यासाठी कुटनीतीचा वापर करण्यात आला व बिरसाला जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांनी 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पैसाच्या आमिषामुळे मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. शेवटी 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसांना पकडण्यात इंग्रजांना यश आलं.
रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. 09 जून 1900 रोजी त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला.
बिरसा यांच्या आंदोलनाची दखल घेत ब्रिटीशांनी “छोटा नागपूर टेनन्सी अॅक्ट” मंजूर केला व आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले (1902). आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बोरस यांची ओळख. आहे. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसेच रांची येथील कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.
नोंद : बिरसा मुंडा यांच्याविषयी लिहिलेली वरील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर काही चुका किंवा एखादी गोष्ट लिहिली गेली नसेल तर खाली कमेंट मध्ये जरूर टाका.
1 टिप्पण्या
https://www.studyy.in/2021/06/who-is-birsa-munda.html